Sangli Sadhu Beaten Up Case : महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यात साधूंना (Sadhu) झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आता या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना रशियावरुन फोन केला आणि साधू मारहाण प्रकरणी सविस्तर अहवाल मागितला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन पोलीस महासंचालकांशी या मारहाण प्रकरणी चर्चा केली, माहिती घेतली. हे प्रकरण गंभीर प्रकरण असून तुम्ही स्वत: या प्रकरणाकडे लक्ष द्या, तपास कसा सुरु आहे, मारहाण करणारे कोण होते, व्हिडीओ व्हायरल कसा झाला याचा संपूर्ण अहवाल द्या, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. देवेंद्र फडणवीस रशियावरुन परतल्यानंतर पोलीस महासंचालकांकडून सविस्तर माहिती घेतील.


काय आहे प्रकरण?
पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. मुले चोरणारी टोळी असल्याची संशयावरुन ही मारहाण झाली होती. चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. एकूण 25 जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल असून, अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. अटकेत असलेले आमसिद्धा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे, हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिद्धआ तुकाराम सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे आणि लहू रकमी लोखंडे हा माजी सरपंच आहे. सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत. 


सांगली पोलीस चार साधूंच्या संपर्कात
मारहाण झालेल्या साधूंचे जबाब पुन्हा सांगली पोलीस घेण्याच्या तयारीत आहेत. सांगली पोलीस या चार साधूंच्या संपर्कात देखील आहेत. काल या मारहाणीचं गांभीर्य समोर आल्यानंतर पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करत गुन्हे दाखल केली. त्यापैकी काही आरोपींना अटक केल्याने पोलीसा आता साधूंचे जबाब नोंदवणार आहेत. मारहाण झालेल्या दिवशी साधूंनी मारहाणीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं जबाबामध्ये म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं. मारहाण झालेले चार साधू सध्या कुठे आहेत? त्यांचे लोकेशन काय हे मात्र गुप्त ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. दरम्यान साधूंना मारहाण करणाऱ्या सात आरोपींना आज दुपारी जत न्यायालयात हजर केलं जाणार आहे.