Maharashtra Heat Stroke : राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला तर दुसरीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. या वर्षी तापमानात खूप वाढ झाली आहे एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाही लाही होत असताना उन्हामुळे घराबाहेर पडणं कठीण होत आहे. त्यातच नवी मुंबईतील खारघर इथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्याच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे (Heat Stroke) अकरा जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान महाराष्ट्रात दरवर्षी 1 मार्च 31 जुलै या कालावधी उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाययोजना आखण्यात येतात. तसेच या आजाराचे दैनंदिन सनियंत्रण करण्यात येते. 2022 मध्ये उष्माघातामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले. 2022 मध्ये उष्माघाताच्या 767 रुग्णांची नोंद झाली. तर त्यापैकी 31 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. तर सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 12 एप्रिल 2023 पर्यंत केवळ एका उष्माघाताच्या रुग्णाची नोंद आहे. खारघरमधील कार्यक्रम 16 एप्रिल रोजी झाल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची तसंच बळींची नोंद या यादीत नाही.
कोणत्या वर्षी उष्माघाताच्या किती रुग्णांची नोंद झाली हे आकडेवारीतून जाणून घेऊया.
(हा अहवाल 12 एप्रिल 2023 पर्यंतचा आहे)
2015
उष्माघाताचे रुग्ण - 28
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 2
2016
उष्माघाताचे रुग्ण- 686
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 19
2017
उष्माघाताचे रुग्ण - 297
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 13
2018
उष्माघाताचे रुग्ण - 2
उष्माघातामुळे झालेले मृत्यू
2019
उष्माघाताचे रुग्ण - 9
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 9
2020
उष्माघाताचे रुग्ण -
उष्माघातामुळे झालेले मृत्यू -
2021
उष्माघाताचे रुग्ण -
उष्माघातामुळे झालेले मृत्यू -
2022
उष्माघाताचे रुग्ण - 767
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 31
2023
उष्माघाताचे रुग्ण - 1
(12 एप्रिलपर्यंत)
उष्माघातामुळे झालेले मृत्यू - 0
2022 या वर्षात झालेले संशयास्पद मृत्यू
नागपूर नगरपालिका - 13
जळगाव - 4
अकोला - 3
नागपूर ग्रामीण, जालना - प्रत्येकी 2
औरंगाबाद, परभणी, परभणी नगरपालिका, अमरावती, भंडारा, उस्मानाबाद, हिंगोली - प्रत्येकी 1
उष्णतेशी संबंधित वेगवेगळे आजार
- उष्णतेशी संबंधित किरकोळ आजार उष्णतेमुळे पुरळ येणं, उष्णतेनं स्नायूंमध्ये पेटके येणं, चक्कर येणं
- उष्णतेशी संबंधित प्रमुख आजार उष्णतेनं शरीरात डिहायड्रेशन (Dehydration) होणं आणि उष्माघात (Heat stroke) होणं
उष्माघात होण्याची कारणं काय?
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामं भर उन्हात फार वेळ करणं
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणं
- काच कारखान्यात काम करणं
- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं
- घट्ट कपड्यांचा वापर करणं
उपाय काय कराल?
- बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळावं.
- कष्टाची कामं सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करा.
- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळा किंवा मटक रंगाचे) वापरू नयेत, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
- जनसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावं.
- सरबत प्यावं.
- अधुनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे आणि सावलीत विश्रांती घ्यावी.
- उष्माघाताची लक्षणं सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणं थांबवावं आणि उपचार सुरु करावा
- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.
हेही वाचा
Maharashtra Bhushan Award Ceremony : रणरणत्या उन्हामुळे अकरा जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात