H3N2 Virus : कोरोनाचं (Coronavirus) संकट आपण सगळ्यांनीच दोन वर्ष भोगलं आहे. आता कुठे हे टेन्शन कमी झालं होतं तर नव्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. एच3एन2 या नव्या व्हायरसने (H3N2 Virus) देशात हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या व्हायरसने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. राज्यात एच3एन2 च्या 119  तर एच1एन1 च्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत. 


कोरोनाचं संकट आता कुठे कमी झालं होतं तर एच3एन2 या नव्या व्हायरसने डोकं वर काढलं. देशासह महाराष्ट्राची चिंता वाढवणाऱ्या या व्हायरसने महाराष्ट्रात दुसरा बळी घेतला. अहमदनगरमध्ये एच3एन2 मुळे पहिला रुग्ण दगावला होता तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये 73 वर्षाच्या वृद्धाचा याच व्हायरसने जीव घेतला आहे. H3N2 चा धोका पाहता प्रशासन अलर्टवर आहे. राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड आणि इन्फ्लूएन्झाबाबत रुग्णांचे नियमित सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


लवकरात लवकर उपचार करा...


पुण्यात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्याप्रकारे काळजी घेतली, त्याप्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. आतापर्यंत पुण्यात H3N2 या विषाणूचे 22 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे.


आजाराची लक्षणे काय आहेत?



  • ताप येणे

  • त्वचा उबदार आणि ओलसर होणे

  • चेहरा लाल होणे

  • डोळे पाणावणे

  • सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी होणे


गर्भवती महिलांना 'ही' लक्षणे दिसल्यास सतर्क राहा


H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात. गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्राँकायटिस, खोकला आणि सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी H3N2 इन्फ्लूएंझाची ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात


कोरोनासारख्या गंभीर आजारावर जशी आपण मात केली तशी या आजारावरही आपण मात करु शकतो मात्र त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. हा आजाराने मृत्यू होणार नाही असं जरी आरोग्यमंत्री म्हणत असले तरी दोन रुग्ण दगावल्याने अनेकांच्या मनात एच3एन2 व्हायरसची भीती बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोकळा श्वास घेणारे आता मात्र तोंडावर मास्क लावून फिरत आहेत.