कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने झटका दिला आहे. शिवसेनेने नऊ पैकी सहा जागांवर विजय मिळवला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या खानापूर गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले होते. त्यामुळे या युतीची चर्चा जिल्हाभर होती. परंतु शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी इथे सत्ता राखण्यात यश आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गावात जातीने लक्ष घातलं होतं. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनलने त्यांना जोरदार धक्का दिला आणि सहा जागांवर विजय मिळवला.
गाव करील ते राव काय करील : प्रकाश आबिटकर
दरम्यान चंद्रकांत पाटील यांना पराभवाचा धक्का देणाऱ्या शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "गाव करील ते राव काय करील, अशा शब्दात आबिटकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, "खानापूरची जनता सुज्ञ आहे. विकासाच्या कामावर हा विजय झाला आहे. त्यामुळे मी खानापूरच्या जनतेचे आभार मानतो.
15 तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.