Gram Panchayat Election Result : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पलटवार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय वजनाच्या बळावर होणारा सत्तापालट असंच काहीसं चित्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये पाहायला मिळत आहे. कराडमधूनही असंच मोठं वृत्त समोर आलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील प्रतिष्ठित नेते पृथ्वीराज चव्हाण, यांना भाजपनं धक्का दिला असून, शेनोली शेरेगावात विजय मिळवला आहे. इथं, भाजप -अतुल भोसले गटाला 12 जागा तर अपक्षला 1 जागा मिळाली आहे. चव्हाणांना मिळालेला हा धक्का राज्याच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना वाव देत आहे.
ग्रामपंचायत निव़डणुकांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून कुठं गुलालाची उधळण सुरु आहे, तर कुठं अटीतटीची रंगतही दिसून येत आहे. तुल्यबळ नेतेमंडळींच्या गावावर कोणत्या गटांचं वर्चस्व पाहायला मिळतं, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे, कारण पुढं इथूनच राज्याच्या राजकारणावरही याचे परिणाम दिसून येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झालं होतं. ज्यांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
काही निवडणुका पूर्णत: तर, काही अंशत: बिनविरोध
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.