मुंबईः रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने मुंबईत खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधूचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधूला 75 लाखांचा धनादेश सूपुर्द केला. सिंधूशिवाय भारताची धावपटू ललिता बाबरलाही 75 लाखांचा इनाम जाहीर करण्यात आला. तसंच पैलवान साक्षी मलिक, अयोनिका पॉल, कविता राऊत, प्रार्थना ठोंबरे, दत्तू भोकनळ आणि देवेंद्र वाल्मिकी यांनाही राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं.
बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, साक्षी मलिक आणि ललिता बाबर यांच्या प्रशिक्षकांनाही 25 लाख रुपये दिले जातील, असं राज्य सरकारने जाहीर केलं.
सरकार दरबारी खेळ हे दुर्लक्षित विषय- मुख्यमंत्री
सिंधूच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खेळांच्या सुविधांवरही भाष्य केलं. खेळांच्या सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची निगा राखणं हे कठीण काम असतं, त्यासाठी राज्यातील विविध क्रीडा संघटनांची मदत घेतली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवण्यासाठी सोयी सुविधांइतकीच खेळाची आवड रुजवणंही गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. सरकारदरबारी खेळ हे दुर्लक्षित विषय असल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं असून खेळाला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.