मुंबई : महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (30 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडीच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल. त्यानंतर ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ जातं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. आज कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय देण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. उद्या (1 डिसेंबर) रविवारीही विधानसभा सुरु राहणार असून या दिवशी अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

162 आमदारांचा पाठिंबा असल्याचा महाविकासआघाडीचा दावा
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचा दावा आहे की, त्यांच्याकडे 162 आमदारांचा पाठिंबा आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 145 आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तिन्ही पक्षांचं संख्याबळ 154 होतं. म्हणजेच तिन्ही पक्ष मिळून सहज बहुमत सिद्ध करु शकतात. याशिवाय काही अपक्ष आणि इतर आमदारांचाही महाविकासआघाडीला पाठिंबा आहे.

जमाने से हम नहीं : संजय राऊत
दरम्यान, महाविकासआघाडी बनणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. "आज बहुमत दिन 170+++++ हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं," असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :
* विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता
* विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे
* नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल (29 नोव्हेंबर) मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. मंत्रालयात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होतं. तसंच उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

मागील दहा दिवसातील नाट्यमय घडामोडी!
राज्यात 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढवली होती. परंतु निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. यादरम्यान राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला आमंत्रण दिलं. परंतु बहुमताचा आकडा नसल्याने सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आमंत्रण दिलं. मात्र त्यांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही.  22 नोव्हेंबर रोजी रात्री महाविकासआघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून एकमताने निवड झाली. परंतु रात्रीच अशा नाट्यमय घडामोडी घडल्या की 23 नोव्हेंबरच्या भल्या सकाळी अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांना धक्का दिला. मात्र पुढील तीन दिवसांत अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आलं आणि 26 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आलं. परिणामी देवेंद्र फडणवीसांनीही राजीनामा दिला आणि 80 तासांच्या आतच फडणवीस सरकार कोसळलं.