मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत पदभारही स्वीकारला. पण उपमुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अजूनही रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार अजित पवारांनी केलाय. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल आणि त्यावर दिल्लीत चर्चा सुरु असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अद्याप एकमत झालं नसल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री काँग्रेसला देण्यात सहमती झाल्याची बातमी आली होती. आणि बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चाही सुरु झाली होती. पण अजित पवांराच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.


उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सत्तेचं वाटप यापूर्वी झालं असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे आलं आहे, असे पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या वक्तव्याला मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या जयंत पाटलांनी देखील दुजोरा दिला आहे. अजित पवार बोलले ते बरोबर आहे. कॉंग्रेसला विधानसभेचं अध्यक्ष पद जाणार आहे, असे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. विधानसभेत उद्धव सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा लागणार आहे. त्यावेळी नव्या सरकारला उपमुख्यमंत्री मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र हे पद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशी चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, अशी माहिती समोर आली होती.

याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे सांगून हे पद राष्ट्रवादी सोडणार नाही, असे सांगितले आहे. महाविकास आघाडीने पद आणि जबाबदाऱ्या आधीच निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असेल असे ठरलेले आहे, असे नमूद करतानाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा अजित पवार यांनी केला. वरिष्ठांनी जे ठरवलं होतं त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनी कालच शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, असेही अजित पवार म्हणाले.