मुंबई : "महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या हिताचा आहे. महाराष्ट्रासारख्या मोठं आणि प्रगत राज्यात अघोरी प्रयत्न करुनही भाजपला आपला मुख्यमंत्री लादता आलं नाही. याचं कारण महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे," असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. "उद्यापासून राज्यात एक नवा मुख्यमंत्री असेल, ठाकरेंचं सरकार राज्याप्रमाणे दिल्लीतही येईल," असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. तसंच "माझी जबाबदारी कमी झाली आहे. उद्यापासून पत्रकार परिषदांमधून नाही तर 'सामना'तूनच बोलणार," असंही संजय राऊत म्हणाले.


विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सत्ता स्थापन करेपर्यंत संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू एकाकी लढवली. सरकार स्थापनेसाठी संजय राऊतांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढावं लागलं. या काळात त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. बैठका, चर्चा केल्या. मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक बसवण्याचा निश्चय पूर्ण केला.

माझी जबाबदारी कमी झाली
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आजपासून माझी जबाबदारी कमी झाली. उद्यापासून मी तुमच्याशी बोलणार नाही. सरकार नवीन येतंय, मुख्यमंत्री मिळत आहेत. आता त्यांनी निर्णय घ्यायचे आहेत. सरकार आणि पक्ष संघटना वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करणार आणि उद्धव मुख्यमंत्री म्हणून राज्याचं काम करतील."

परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून
परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले याचा अर्थ परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. अघोरी प्रयत्न करुन भाजपने सत्ता राखण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या जनतेने तो उद्ध्वस्त केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा अघोरी प्रयत्न संपवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राने देशाला नवी पहाट दाखवली, असं राऊत म्हणाले.

सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर लॅण्ड
आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षित लॅण्ड करेल, असं मी मागे म्हटलं होतं. तेव्हा माझ्यावर टीका झाली. माझी चेष्टा केली. पण आमचं सूर्ययान सुरक्षितपणे लॅण्ड झालं आहे, काळजी करण्याचं कारण नाही, असा मिश्किल टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

शरद पवार काय म्हणाले?
काल हे सगळे नीटनेटकं झाल्यानंतर सोफिटेल हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा शरद पवार मला म्हणाले... संजय, उद्या हे आमदार आपापल्या खुर्च्यांमध्ये विराजमान होतील. आपल्याला कुठलं काम उरलं नाही. आपल्या दोघांना आता दिल्लीत जाऊन परत कामाला लागावं लागेल, असा संवाद शरद पवारांसोबत झाल्याचं संजय राऊत सांगितलं.

मी चाणक्य नाही, योद्धा आहे
गुपचूप शपथ उरल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचं सरकार कोसळलं. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होणार असले तरी सगळेकडे चर्चा शरद पवार आणि संजय राऊत यांच्या चाणक्यनीतीची आहे. याविषयी राऊत म्हणाले की, "मी चाणक्य नाही. मी योद्धा आहे, कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. चाणक्य मोठी उपाधी आहे. आम्ही लढणारे लोक आहे. आयुष्यात कायम संघर्ष केला आहे. परिणामांची कधीच काळजी केली नाही.