राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्यपालांकडून मदतीची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2019 05:39 PM (IST)
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली होती.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली होती. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्टरी मदत तर बागायत शेतीसाठी 18 हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश देखील राज्यपालांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील 325 तालुक्यात अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे केली होती. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला होता. शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी यासाठीचे निवेदन दिले होते. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी देखील राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या कहरामध्ये सोयाबीन, कापसासह खरीपाची पिकं पाण्यात गेली होती.