Maharashtra Government : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना सिद्धगड तर दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला मिळाला आहे. आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाही. मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप झाले पण खाती कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवार आणि आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मागील काही दिवसांपासून विरोधकांनी खातेवाटपावरुन सरकारवर टीका केली आहे. 


कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला ?


सात मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना ब-6 सिद्धगड, हसन मुश्रीफ यांना क-8 विशालगड बंगला देण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांना क-1 सुवर्णगड बंगला मिळाला आहे. तर धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड आणि धर्मरावबाबा आत्रम यांना सुरुचि -3 हा बंगला देण्यात आला आहे. अनिल पाटील यांना सुरुचि 8 तर संजय बनसोडो यांना सुरुचि 18 बंगला देण्यात आला आहे. आदिती तटकरे यांना अद्याप बंगला देण्यात आलेला नाही. अजित पवार यांच्याकडे देवगिरी बंगलाच ठेवण्यात आल्याचे समजतेय. 
 
कुणाला कोणते दालने ?


छगन भुजबळ यांना मंत्रलायत दुसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक 201 देण्यात आले आहे. हसन मुश्रीम यांना चौथ्या मजल्यावर दालन क्रमांक 407 मिळाले आहे. दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे यांना तिसऱ्या मजल्यावरील अनुक्रमे 303 आणि 301 दालन मिळाले आहे. धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावरील 201 ते 204 आणि 212 ही दालने मिळाली आहेत. धर्मरावबाबा आत्रम यांना सहाव्या मजल्यावर 601,602 आणि 604 ही दालने मिळाली आहेत. आदिती तटकरे यांना पहिल्या मजल्यावर 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे. 


मंत्रिमंडळ विस्तार कधी ?
 राज्यात मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटपाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण हा विस्तार प्रत्यक्षात कधी उतरणार याची वाट सगळेच पाहत असल्याचं चित्र सध्या आहे. पण तरीही हा प्रश्न अजून काही मार्गी लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात तिघांचं सरकार आलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा तेढ आणखीच वाढला असल्याचं आता म्हटलं जात आहे. महायुतीला मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप करताना तारेवारची कसरत करावी लागत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगल्या खात्यांची मागणी होत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. महायुतीमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुभवी आणि जेष्ठ मंत्रीपदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे मंत्रीपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री अजित पवार मागणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


राष्ट्रवादीकडून कोणत्या खात्यासाठी आग्रह?
राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून  सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.