Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील गोव्याहून मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिंदे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री किंवा उद्या सकाळी शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळतेय.


ठाकरे सरकारनं बदलवलेल्या, रद्द केलेल्या निर्णयांचं काय?


ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारचे बरेच निर्णय ठाकरे सरकारने पहिल्या महिन्या दोन महिन्यात फिरवले होते तर काही रद्द केले होते.  त्यातले किती परत घेईल नवे सरकार येईल याची चर्चा सध्या सुरु आहे. यात महत्वाचं म्हणजे आरे कार शेड, थेट सरपंच निवड, शहरांचं नामांतर तसंच प्रकल्पांचं नामकरण अशा अनेक मुद्द्यांवरुन ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली होती. यातील औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर तसंच नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याला भाजपचा विरोध नव्हता. त्यामुळं हे निर्णय मात्र कायम राहतील अशी शक्यता आहे.


या योजनांना गती मिळेल का?


त्याशिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार, बळीराजा चेतना योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या योजनांना गती मिळेल का? हे देखील पाहावं लागणार आहे. या योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर भाजपच्या गोटातून येत होता. कोरोना काळात आरोग्य सुविधा तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला भाजपकडून घेरलं जात होतं. त्यामुळं आरोग्य क्षेत्रात हे नवं सरकार काय सुधारणा आणेल याकडेही लक्ष लागून आहे.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मेट्रो, बुलेट ट्रेन असे अनेक मुद्दे देखील या काळात चर्चिले गेले. यावर आता हे नवं सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणंही महत्वाचं आहे. 


ज्यामुळं आंदोलनं झाली त्या विषयांवर काय निर्णय होणार?


ठाकरे सरकारच्या काळात अनेक आंदोलनांनी जोर धरला होता. यात महत्वाची अन् लक्षवेधी आंदोलनं ठरली ती मराठा आरक्षण आंदोलन आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. या आंदोलकांच्या पाठिशी राहत विरोधात असताना भाजपनं सरकारला जेरीला आणले होते. शिवाय पिकविमा, पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करणे, ओबीसी आरक्षण अशा आंदोलनांवरुनही भाजपनं ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. आता याबाबत मागण्या करणारे भाजप सत्तेत येणार आहे, त्यामुळं हे नवं सरकार आता या मागण्यांकडे कसं पाहतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा


Maharashtra Government Formation : फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार


Shivsena : बंडखोरांना लागला भाजपचा लळा, पण युतीत शिवसेना 73 वरून 56 वर दुसरीकडे भाजप 42 वरून105 वर!