Vijay Wadettiwar: कोविड (Covid 19) काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Government of Maharashtra Public Health Department) संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्यानं संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला विचारला आहे.                                     


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) म्हणाले की, "जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी सन 2020-21 या कोविड कालावधीतील दैनंदिन वापराच्या वस्तुंचे सुमारे 31 कोटींचे देयक मान्यतेसाठी सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील त्रुटींपासून 18 कोटी 92 लाख 88 हजार 644 रूपयांचा शासन निर्णय संकेत स्थळावर अपलोड करण्यात आला. हा शासन निर्णय अचानक गायब करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचं हे गौडबंगाल चव्हाट्यावर आलं आहे. याबाबत संशय बळावला आहे. शासन निर्णय संकेतस्थळावरून काढताना कोणतीही विहिती कार्यपद्धती न अवलंबता असं कृत्य करणं हे नियमाला धरून नाही. त्यामुळे नियम पायदळी तुडवून हवे तसे, निर्णय घेणाऱ्या आरोग्य विभागाची अवस्था वाईट आहे."                            


सरकारचे आरोग्य विभागावर नियंत्रण राहिले नसल्याचेही खडेबोल श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत. त्याचबरोबर हे प्रकरण नक्की काय आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.  खासगी संस्थांचे हवेतसे, हळहळू, गरजेनुसार नियम पायदळी तुडवून खिसे भरण्याचा आरोग्य विभागाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सरकार लगाम घालणार का? असा, सवाल करत श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी न करता खासगी संस्थांची काळजी करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा त्यांनी निषेधही केला आहे.          


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य, गावात बंदी घालणे पर्याय नाहीच; मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया