Maharashtra Floor Test : महाराष्ट्र विधानसभेत उद्या (30 जून) ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सरकार अल्पमतात असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. त्यानंतर राज्यपालांनी आज मुख्यमंत्री आणि विधानसभा सचिवालयाला पत्र पाठवून उद्या विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार उद्या बहुमत चाचणी पार पडेल. 


बहुमत चाचणी म्हणजे काय?
बहुमत चाचणीद्वारे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठरवलं जात.  यासाठी विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं. निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. कारण, मतदान करायचं की नाही, याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केलं, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले असले तरी या प्रक्रियेत राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. यासाठी आमदारांना व्यक्तिश: हजर राहावं लागलं. तसंच सर्वांसमोर मतदान करावं लागलं. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शीरगणतीने मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आमदारांनी विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्ष व्हिप जारी करतो.


पाहा व्हिडीओ : बहुमत चाचणी म्हणजे काय? महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट कशी घेतात?



महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा काय?
राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 145 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे आकडे जास्त तो पक्ष सरकार स्थापन करु शकतो.


शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, आज संध्याकाळी पाच वाजता सुनावणी 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकार दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 


संबंधित बातम्या