मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बिग बी अमिताभ बच्चन मदतीसाठी पुढे आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिजने 5 कोटी रुपयांची तर अमिताभ बच्चन यांनी 51 लाखांची मदत पूरग्रस्तांना केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये त्यांनी ही मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देत त्यांचे आभार मानले.





"अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये 51 लाख रुपये जमा केले आहेत. ही रक्कम सांगली, कोल्हापूर, सातारा याठिकाणी पूरग्रस्त भागातील मदत आणि योगदानासाठी अनेकांना प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.





याआधी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा-देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत केली आहे.


तर मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने 'सय्यद फाऊंडेशन'च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या एक हजार मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी 5 कोटींची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा तिने केली आहे. तसेच प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे.



सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापुरात मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील उभं पिक आडवं झालं आहे. अनेक घरांचं नुकसान झालं आहे. पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. या महापुरात आतापर्यंत 60 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.



राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 6813 कोटींची मदत मागितली आहे. यापैकी 4708 कोटी रुपये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मदतीसाठी तर 2105 कोटी रुपये कोकण, नाशिक आणि इतर जिह्यात मदतीसाठी वापरले जाणार आहेत.