Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा (Johnson Baby Powder) परवाना रद्द करण्यात आला आहे. उत्पादनाच्या पद्धतीत दोष असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईमधील मुलुंड स्थित जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील या पावडरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यामध्ये काही धोकादायक पदार्थ आढळल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा (Johnson Baby Powder) परवाना रद्द केला आहे. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. याचा नवजात बालकांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द केला.


जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर त्वचेसाठी नुकसानदायक


मुंबईतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आलाय. उत्पादनाच्या पद्धतीत दोष असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाच्या पद्धतीमध्ये दोष आढळल्यामुळे बेबी पावडरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही पावडर पीएच हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु आणि लहान मुलांच्या त्वचेला नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेबी पावडरचे उत्पादन सुरू ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे संस्थेच्या मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.


अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरवर दोन वर्षांपासून बंदी


जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर अमेरिका आणि कॅनडामध्ये दोन वर्षांपासून बंदी आहे. या पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे कंपनी विरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी विरोधात 40 हजारहून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर बंदी घालण्यात आली. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये 'एस्बेस्टस' नावाचा घटक असल्याचा आरोप आहे. हा पदार्थ कॅन्सर रोगास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कंपनीविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते.


पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त


बेबी पावडरचे नमुने प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळल्याने महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शुक्रवारी महाराष्ट्रातील ठाण्यातील मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन प्लांटचा उत्पादन परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या नमुन्यांमध्ये पावडरचे pH मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील उत्पादनाचे उत्पादन आणि विक्री थांबवली आहे.


पीएच (pH) मूल्य म्हणजे काय?


पीएच हे पदार्थाच्या आंबटपणा आणि क्षारतेचे मोजमाप आहे. हे pH स्केल किंवा pH बारवर मोजले जाते. जेथे 0 अम्लीय आणि 14 अल्कधर्मी दर्शवितो. बाळाची त्वचा प्रौढांच्या त्वचेपेक्षा नाजूक असते. नवजात मुलांच्या त्वचेचा पीएच किंचित जास्त असतो. त्यामुळे 5.5 pH मूल्यापेक्षा जास्त pH मूल्य बाळाच्या संवेदनशील त्वचेला गंभीर नुकसान करू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या