Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.  हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे. 


दरम्यान, आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. काल राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी या पावसामुळ वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?


कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.


 
मुंबईत जोरदार पाऊस
 
मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली. रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. दरम्यान, या पावसामुळं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.   


बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
 
बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं जिल्ह्यात काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. जळगाव जामोद , मोताळा , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. 


परभणीत पावसाची जोरदार हजेरी


परभणीत (Parbhani) पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले असून छोट्या मोठ्या नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत. जिल्हाभरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुरू असलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


धुळे जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान


धुळे (Dhule) जिल्ह्यातही जोरदर पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळं शेती पिकं पिवळी पडत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद आणि मिरची या पिकामध्ये पाणी साचल्यानं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.