OBC reservation : महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदांची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. याला महाविकास आघाडीसह भाजपचाही विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमधील पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की, 'ओबीसी आरक्षणासहितच निवडणूक व्हावी ही सरकारची भूमिका आहे. पावसाळ्यात निवडणूक घेण्यात अडचणी येतात, निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विचार आहे. 92 नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करू. निवडणूक ओबीसी आरक्षासहितच व्हावी, ही आमचाही इच्छा आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.' ओबीसी आरक्षणाबाबत तुषार मेहता यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्ताधारी आणि विरोधक या सर्वच नेत्यांनी ही निवडणूक ओबीसी आरक्षणासहच व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली. 


17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर -
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून  19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. 


निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांचा पुनर्विचार करावा - बावनकुळे
राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातल्या काही नगर पालिका व नगर पंचायती  निवडणुका जाहीर केल्या आहे.. मात्र, जुलै, ऑगस्ट ची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी पूर परिस्थिती राहण्याची शक्यता आहे... 80 टक्के मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाही.. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने राज्य सरकार सोबत सल्ला न करता निवडणूक जाहीर केल्या आहे.. सर्व पक्षीय कार्यकर्ते निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत आहे... आम्ही सोमवारी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 92 नगर परिषद मधील राजकीय कार्यकर्त्यांसह निवडणूक आयोगाला भेटणार आहोत.. निवडणुका सप्टेंबर महिन्यानंतर घ्याव्या... सप्टेंबर पर्यंत प्रशासन पूर्णपणे खरीप हंगाम, शेती विषयक बाबी तसेच पूर परिस्थिती सांभाळण्यात व्यस्त असतो... अशा काळात निवडणूक लाऊन त्यांच्यावर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही.... निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीबाबत पुनर्विचार करावा, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.