बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, 9 डिसेंबर रोजी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. राज्य सरकारचा विरोध असला तरी कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा आयोजित केला जाईल असं महाराष्ट्र एकीकरण समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संबंधी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन हे बेळगावात होतं. त्या माध्यमातून बेळगाववर कर्नाटकचा दावा मजबूत करण्याची खेळी खेळण्यात आली आहे. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगावात अधिवेशन नको असं महाराष्ट्र एकीकरण समितीचं म्हणणं आहे. त्यामुळेच या अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जातो.
मराठी भाषिकांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळावाबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी माजी आमदार किणेकर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केला. तसेच महामेळाव्याचे आयोजन आणि त्यासाठीच्या परवानगी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, "बेळगावमध्ये येत्या 9 डिसेंबर 2024 रोजी कर्नाटक सरकारची हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र एकीकरणतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा घेत असून त्याची कल्पना आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे."
कर्नाटक सरकारने जेव्हा 2006 पासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक या नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आलं. त्यानंतर 17 जानेवारी रोजी बेळगाव, बिदर आणि कारवार हे मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकला जोडण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णायामुळे मराठी बांधवामध्ये संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी आंदोलनाचा मार्गही अवलंबला होता. त्यानंतर गेल्या 60 वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यातील मराठी जनतेने आंदोलनाचा मार्ग वापरत लढा सुरू ठेवला आहे.
ही बातमी वाचा: