मुंबई: मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला, तळपणारा सूर्य मी म्हणू लागलाय. साठवलेल्या पाण्याची वाफ आभाळाकडे धावतेय आणि आभाळ मात्र उन्हाच्या झळा देतंय. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जमिनी भेगाळल्यात, पिकं करपलीयेत अन् पाणीसाठा घटतोय. तर चिंता दिवसागणिक वाढू लागलीय. राज्यावरील दुष्काळाच्या छायेने काळजामधील काळजीत भर घातलीय.


एका खांद्यावर कळशी आणि दुसऱ्या हातात लहानगं बाळ घेऊन महिलांची पायपीट चाललीय ती घोटभर पाण्यासाठी. पाणी कुठे मिळेल हे माहीत नाही, पण  तरीही घराबाहेर पडायचं आणि पाण्याचा शोध घ्यायचा. जिथे पाणी मिळेल तिथून ते घ्यायचं आणि पुन्हा पायपीट करत घरी यायचं. धाराशिवच्या अनेक गावांची तहान या महिलांच्या डोक्यावरच्या हंड्यावर अवलंबून आहे.


जिथं माणसांना प्यायला पाणी मिळेना, तिथं आता शेतीतील बागांना ओलावा कुठून मिळणार? असं मोठं प्रश्नचिन्ह हिंगोलीतल्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालंय. हिंगोलीच्या असोला गावातील शेतकरी बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडील विहिरीच्या भरवशावर दोन एकर केळीची लागवड केली. मात्र पाणी नसल्यामुळे केळी जमिनीवर सुकून पडल्या, तर पपईचं फळ झाडावरच काळवंडून गेलं. 


निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेलं आणि एरवी निसर्ग संपदेमुळे नंदनवन असलेल्या मेळघाटातही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. खडीमल गावात टँकर आला रे आला की महिला, मुलं आणि कच्चा-बच्चांची नुसती मुरकंड पडतेय. 


महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या  नागपूरच्या वेशीवरील ईसासनी गावातली अशीच काहीशी परिस्थिती. 30 हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी पाणी चक्क विकत घ्यावं लागतंय. रोज 15 खासगी टँकर 150 फेऱ्या मारत भाजीपाला विकावा तसं पाणी विकत असल्याची विषण्ण करणारी परिस्थिती इथं निर्माण झालीय. 


तहान भागवण्यासाठी नाशिककरांची ज्यावर मदार असते, त्या गंगापूर धरणाचा तळ आता उघडा पडलाय. गंगापूर धरणात अवघा 25 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे नाशिककरांच्या दारात पाणीटंचाईचं संकट येऊन उभं राहिलंय. 


एकूणच, महाराष्ट्राच्या घशाला कोरड पडलीय आणि डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झालेत. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहव करावे लागतायत. उसणवाऱ्या करून, कर्जकज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत माना टाकल्या आहेत. राज्यातील  धरणांचा तळ आता उघडा पडलाय. कधीकाळी पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या अनेक जलाशयांमध्ये आता फक्त दिसतायत ते खडक आणि चिखल. त्यामुळे सरकारने या धूळमाखल्या भवतालात उपाययोजनांचं सिंचन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


ही बातमी वाचा: 



Maharashtra Drought : दुष्काळाची होरपळ,पाण्यासाठी तळमळ; महाराष्ट्रातील दुष्काळाचं भयाण चित्र