ST Buses  Diwali 2022 : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा (Extra Buses for Diwali Vacation) बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे. 


एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन 1494 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.  मागील वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी दिवाळीतच आंदोलन पुकारले होते. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला. 


प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.  सध्या औरंगाबाद प्रदेशातून 368, मुंबई 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274 व अमरावती येथून 71 बस गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती चन्ने यांनी दिली. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


दरम्यान,  एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत 75 वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे.  तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून 50 टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.