Maharashtra Din LIVE Updates : राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह; वाचा प्रत्येक अपडेट्स
यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार आहे. राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. वाचा प्रत्येक अपडेट्स....
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी अनोखे आंदोलन केले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावले आहेत. ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र आहे, त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावल्याने पोलिसांनी काही जणांवर कारवाई केली आहे. विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्र मंडळाला एक पत्र पाठवून सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या प्रयत्नांना बळी न पडता समाजात एकोपा कायम राखण्याचा, पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा तसेच आपल्या मेहनतीतून प्रगतीचा आलेख सतत उंचावत नेणाऱ्या सर्व कामगारांचा सन्मान करण्याचा निर्धार करूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा!
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख म्हणाले, कोविड-19 सारख्या कठीण काळातही महाराष्ट्र प्रगती करत राहिला. कोविड काळात राज्याने केलेल्या उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरनेही कौतुक केले आहे. मुंबईने देशाच्या विकासात नेहमीच मोठा हातभार लावला आहे. मुंबईची ही तत्परता या संकटकाळातही पुन्हा देशाने पाहीली.
प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित केलेले हे सचित्र प्रदर्शन राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती नक्कीच लोकांपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वासही मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनाचे फित कापून दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनस्थळी प्रारंभी प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. दीपक कपूर यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे हे प्रदर्शन दि. १ ते ५ मे या कालावधीत ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य शासनाने कोविड काळातही विकासकामांमध्ये खंड पडू न देता सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी केली आहे. राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रातिनिधिक सचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून योजना व विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वरळी सी-फेस, कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. ठाकरे व मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, संचालक गोविंद अहंकारी, संचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, कोविड-१९ सारख्या महासंकटासोबतच महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींचा सामना करत राज्य शासनाने विकासकामांमध्ये सातत्य ठेवत चांगली कामगिरी केली. कोविड कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था कार्यान्वित ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. राज्य शासनाच्या या कामगिरीस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शन सारखे उपक्रम महत्वाचे आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या विभागीयस्तरावर आयोजित प्रातिनिधिक प्रदर्शनांना नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.
रत्नागिरीत देखील महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. पालकमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पोलीस ग्राउंड येते कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस दलातील उत्तम कामगिरी करणाऱ्याचा देखील सन्मान करण्यात आला. शिवाय, पोलीस दलात 4 बाईक आणि 8 चारचाकी गाड्या देखील सामील करून घेण्यात आल्या.
सांगली : महाराष्ट्रात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येतेय. राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत देखील वाढ होऊ लागलीय
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सांगलीत महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याच्या भाषणात बोलताना वक्तव्य
चौथ्या लाटेला रोखायचे असेल तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे देखील नागरिकांना केले आवाहन
यवतमाळ : यवतमाळमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. पोस्टल मैदानावर आयोजित या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस, शासकीय अधिकारी यांचेसह पुरात वाहून गेलेल्या एसटी बस मधून प्रवाश्यांचे जीव वाचविणाऱ्या अविनाश चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या योगदानातून महाराष्ट्र राज्य आज अग्रेसर असल्याचे यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले.
कस्तुरचंद पार्क मैदानात महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 विदर्भवाद्यांना पोलिसांकडून अटक...
Devendra Fadnavis On Maharashtra Din : देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकात पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे नगरसेवक, आमदार एकाच रंगाचे फेटे बांधून हुतात्मा चौकात, जोरदार घोषणाबाजी
पुणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- आता जेलमध्ये कैद्यांना मिळणार कर्ज, तारण नाही, 50 हजाराचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार
- राजकीय सभा आहेत ,कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आम्ही सज्ज आहोत
1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं औचित्य साधून पिंपरी-चिंचवड ते मुंबई दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. शेकडो कामगार मुंबईत आझाद मैदानावर दुचाकी मोर्चा काढणार होते, परंतु कालच पोलिसांनी आयोजकांना नोटीस दिली. निवेदन याच ठिकाणी द्यावं असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. आज सकाळीच मुंबईच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार कामगारांना पिंपरी पोलिसांनी अडवलं.
ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राने देशाप्रती सर्वोच्च योगदान दिले आहे.महाराष्ट्रात अशा थोर विभूतिंचा जन्म झाला ज्यांनी या राष्ट्राला दिशा दिली.प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्राची भारताच्या आर्थिक प्रगतीत नेहमीच अग्रणी भूमिका राहिली. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान महापुरुषांनी महाराष्ट्र आणि भारतासाठी आपलं योगदान देत समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ सुरु होत आहे..
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Maharashtra Din LIVE Updates : महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईतील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री मुंबईत शिवाजी महाराज पार्क इथं होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहेत.
कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे.दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होते, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग - गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झाले. संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनानेअगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते.
महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.
आज दुर्देवाने स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो. एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे काही केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले असे नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे. आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत, विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे.
संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.
मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील.
माझे सर्वांना,अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात.
Maharashtra Din LIVE Updates : हुतात्मा चौक येथे खासदार अरविंद सावंत,मनपा आयुक्त इकबाल चहल, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील इत्यादी उपस्थित आहेत
Maharashtra Din LIVE Updates : नवी मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई महानगर पालिकेवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई महानगर पालिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Din 2022 : मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Divas) उत्साह खूप मोठा असतो. मराठी माणूस हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे विविध कार्यक्रम, परंपरा दर्शवणाऱ्या मिरवणुका अशा सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांनी या दिनाचा सोहळा साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिनाचा उत्साह कोरोनामुळं अनुभवता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार आहे.
1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
काय आहे महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आपल्या एका लेखात लिहितात 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -