Dharashiv News: अतिवृष्टीमुळे धाराशिवमधील (Dharashiv) शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवमध्ये जमावबंदीचे आदेश असूनही आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. 


सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे 2022 मध्ये नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे, हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ढोकी येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मात्र जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शनिवारी ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश असूनही आंदोलन केल्याने राष्ट्रवादीच्या 30  कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहे. 


आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला...


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धाराशिव तालुक्यातील ढोकी साखर कारखाना चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून त्या शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रकार केल्यामुळे अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला होता. तर हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिस प्रशासनाने वरिष्ठांच्या दबावाखाली गेल्या दोन दिवसांपासून या परिसरातील गावांमध्ये पोलिस पाटलांच्या माध्यमातून उद्या ढोकी येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये कोणीही सहभागी होऊ नये. सहभागी झालात किंवा होण्यासाठी गेला तर तुमच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम दिला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.


आंदोलनकर्त्यांच्या मागण्या! 



  • जिल्ह्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटामध्ये मागील दोन वर्षांपासून अडचणीत आला आहे.

  • शासनाला वेळोवेळी केलेल्या मागण्यांसदर्भात कसलीही ठोस कार्यवाही केली नाही.

  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत 22 हजार क्विंटल हरभरा व्यापाऱ्यांना विकलेला आहे. मात्र शासनाने अद्यापपर्यंत हमी भावाने खरेदी करण्यासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत.

  • त्यामुळे शासनाने 30 हरभरा खरेदी केंद्र त्वरित मंजूर करून चालू करावीत.

  • हरभरा खरेदी करताना शेतकन्यांसाठी हेक्टरी 15 क्विंटल हरभरा उत्पादकता जाहीर करावी.

  • शासनाने कांद्याला 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान मंजूर करून हमीभाव खरेदी केंद्र त्वरित चालू करावीत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna News: व्याजासाठी सावकाराचा तगादा, मारहाणही केली; जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या