Devendra Fadnavis : गट शेतीशिवाय (Group Farming) पर्याय नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. गट शेतीमुळं बार्गेनिंग पॉवर वाढते. गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा, नवीन पद्धतीचा वापर करण्याची क्षमता तयार झाल्याचे फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार असे फडणवीस म्हणाले. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पानी फाऊंडेशनच्या (Paani Foundation) उपक्रमाचे कौतुक केले.


गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकट आली आहेत. यासाठी शाश्वत शेतीकडे वळावे लागेल. यासाठी विषमुक्त शेती गरजेची असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सध्या शेतीत रासायनिक वापर होत असल्यानं आपल्या काळ्या आईची शक्ती समाप्त झाली आहे. दुसरीकडे तेच अन्न खाऊन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचं असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.


नापीक असणारी शेती 30 वर्ष आम्हाला द्या...


दरम्यान, नापीक असलेली जमीन आम्हाला द्या. त्याचा आम्ही शेतकऱ्यांना सलग तीस वर्षे मोबदला देऊ. त्यानंतर ती शेती परत देऊ असेही फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा ऐकल्यावर जसं स्फुरण चढतं, तशा गाथा तुम्हा शेतकऱ्यांच्या ऐकल्यावर नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांमध्ये स्फुरण चढेल. तो शेतकरी देखील हनुमान उडी घेईल असे फडणवीस म्हणाले. 


पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावागावात क्रांती 


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या कामाचं कौतुकही केलं. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावागावात क्रांती घडत आहे. शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याचे काम पानी फाऊंडेशनने केले आहे. शेतकऱ्यांनी जी हनुमान उडी घेतली, त्यामुळं विषमुक्त शेतीच्या दिशेने आपण पावलं टाकत असल्याचे फडणवीस म्हणाले. फार्मर कप स्पर्धेच्या 2022 या पर्वातील पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते. या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 2 हजार 500 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या शेतीत जो अभूतपूर्व बदल घडवून आणला आहे, त्या शेतकऱ्यांचा सन्मान फडणवीस यांच्या हस्ते झाला.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget 2023 : तीन वर्षात 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार, एक हजार कोटींचा निधी खर्च करणार : फडणवीस