मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयासह राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जागोजागी साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदन, बहारदार संचलन आणि विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. यंदा पहिल्यांदाच अत्यंत साधेपणाने आणि शांततेत महाराष्ट्र दिन साजरा होत आहे.


मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.
या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक , तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे प्रथमच मंत्रालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात झाला. मुख्यमंत्री हे स्वतः वाहन चालवीत हुतात्मा स्मारक व मंत्रालयातल्या कार्यक्रमासाठी पोहचले

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
संयुक्त महाराष्ट्रचा 60 वा महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता मात्र तसा करता आला नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी झेंडावंदन कार्यक्रम देखील साध्या पध्दतीने साजरा केला.

सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला. कोरोनामुळे या कार्यक्रमास गर्दी होणार नाही या दृष्टीने मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते. यामध्ये कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 

महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण
जालना येथे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा ध्वजारोहण सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

वाशिम:महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणे साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन  वाशिम येथे अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना हे उपस्थित होते. सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला.

सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन
महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री व मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ध्वजवंदन करण्यात आले.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ

महाराष्ट्र दिनानिमित्त अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत जिल्हाधिकारी कार्यालयात  ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील हे मोजकेच अधिकारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग पालन व्हावं आणि गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अवघ्या 5 मिनिटात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकला.

जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने हा सोहळा संपन्न झाला. मोजक्या पोलीस कर्मचाऱ्यांचा वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ बी एन पाटील उपस्थित होते.

परभणीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण
परभणीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्यांदाच काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्स पाळून पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी केवळ जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद सीईओ यांची उपस्थिती होती. शिवाय फक्त पोलिसांच्या केवळ 5 जणांच्या प्लाटूनने सलामी देऊन हा सोहळा पार पडला.