मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील प्रशासनानं अखेर काही कठोर निर्बंधही लागू केले. शिवाय नागरिकांनी या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही शासनाकडून करण्यात येत आहे. 


दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागानं प्रसिद्ध केला. यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. 


Mumbai Local: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; मुंबई लोकल बंद नाही, पण...


राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं  222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह लिवगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळं आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे. 






राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध 


कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र, खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.


मुंबईतही नियम आणखी कडक 


अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत येत्या काळात जिम, मॉल, रेस्तरॉ बंद राहणार असून यामध्ये पार्स सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी लागू असणाऱ्या संचाचरबंदीमध्ये आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्येच कार्यरत असणाऱ्यांना वाहनं चालवण्याची आणि अत्यावश्यक सेवांच्याच वाहनांपुरता परवानगी असणार आहे. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवासाची मुभा असेल.