Fuel Price Hike and Tax : इंधन दरवाढीच्या मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे. केंद्रीय कराचे रूपांतर दरोड्यात केल्याने इंधन दरात मोठी वाढ झाली असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) केंद्रीय समिती सदस्य आणि राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने भरमसाठ कर वाढवल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हा पेट्रोलवर 9 रुपये 48 पैसे तर डिझेलवर 3 रुपये 56 पैसे इतका केंद्रीय उत्पादन कर होता. मागील सात वर्षात पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन कर 28 रूपये 90 पैसे आणि डिझेलवर 21 रूपये 80 पैसे इतका करण्यात आला. याचाच अर्थ सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन करात 300 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ केली. ज्या प्रमाणात आयात क्रूड तेलाच्या किंमती कमी होत गेल्या त्याच पटीत केंद्र सरकारने कर वाढवले. वर्ष 2014-15 मध्ये केंद्र सरकारला या करातून 1 लाख 26 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर, वर्ष 2020-21 मध्ये 4 लाख 19 हजार कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याचे नारकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने कराचे रुपांतर दरोड्यात केल्याने जनता महागाईत होरपळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारने सर्व राज्यांच्या एकत्रित पेट्रोलियम कर उत्पन्नापेक्षा केंद्राचे कर उत्पन्न दुप्पट केले. या वाढीव कराच्या बोझ्याने एकाच वेळी ग्राहक आणि राज्य सरकारे यांच्यावर मात केली असल्याचे नारकर यांनी सांगितले. देशातच मागणीच्या 45 टक्के स्वयंपाकाचा गॅस तयार होतो. देशातील क्रूड तेल, गॅस यांचा उत्पादन खर्च कमी आहे. पण जनतेला विकताना मात्र आयात तेलाइतका दर लावतात. आयात न केलेल्या तेलाला आयात तेलाचा दर लावतात. ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेट्रोल-डिझेलवरील केंद्र सरकारच्या करांमध्ये त्वरित 50 टक्के कपात करावी, गॅसच्या किंमती त्याच्या खऱ्या उत्पादन खर्चानुसार आकारून, त्या ५०० रुपये प्रति सिलिंडरपर्यंत खाली आणाव्या अशी मागणी माकपच्यावतीने करण्यात आली. इंधन दरवाढीच्या विरोधात आज राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल पंपाबाहेर सत्याग्रह करण्यात आला होता. आज सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपाबाहेर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या दरम्यानच्या वेळेत काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. त्याशिवाय ग्राहकांनाही या तासाभराच्या कालावधीत वाहनात इंधन न भरण्याचे आवाहन करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: