मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या 154 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आजच्या दिवशी 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.17 टक्क्यांवर पोहोचलं आहे तर मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे. 


राज्यात शनिवारी कोरोनाच्या 14,790 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2,421 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या तर 12,369 इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. आजच्या दिवसाचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 1.04 टक्के इतका आहे. 


राज्यातील JN 1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 139 


JN 1 व्हेरियंटच्या (JN.1 Sub-Variant) रुग्णांची संख्या ही 139 इतकी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण 91 रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये 30 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 5 तर बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नांदेडमध्ये 2 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


देशात JN.1 च्या रुग्णसंख्येत वाढ


कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे  केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.देशात JN-1 प्रकारांच्या संख्येत झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. JN-1 प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएंझा सारखा आजार आणि श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्यास आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.


कोविड टास्क फोर्सच्या महत्त्वाच्या सूचना


ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आलाय. कोविड टास्क फोर्सची 2 जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना झाल्यास  गृह विलगीकरणात पाच दिवस राहावे लागेल. हवा खेळती राहिल अशा खोलीत रहावे. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिजोखिम असलेल्यांनी मास्क वापरावे. अतिजोखिम व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात यावे. अशा सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्यात. 


दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचारासंदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहेत. पण सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोविड टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान परिस्थिती चिंताजनक नसली तरी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन करण्यात आले. 


ही बातमी वाचा :