यवतमाळ : राज्यामध्ये कापूस पणन महासंघाची खरेदी प्रक्रिया केव्हा सुरू होते याची याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता कापूस खरेदी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. खरीप हंगामात राज्यात 39.37 लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून त्यातून 75 लाख कापूस गाठी तयार होणार आहेत. विशेष म्हणजे राज्यात 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया पणन महासंघाकडून  सुरु करण्यात येणार आहे. पणन महासंघाच्या 50 केंद्रावर तर सीसीआय (भारतीय कपास निगम लिमिटेड) च्या 74 केंद्रावर ही कापूस खरेदी प्रक्रिया केली जाईल आणि चांगल्या दर्जाच्या कापसाला 6025 असा हमीभाव मिळणार आहे.


राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे साधारणपणे 6.5 लाख हेक्टर वर कापसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादनामध्ये घट येणार आहे असेही कापूस पणन महासंघाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला जास्तीत जास्त 12 क्विंटल पर्यंतच कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे. कापूस विक्री साठी आणताना 12 टक्के पेक्षा जास्त मॉईश्चर असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी वाळवलेला कापूस घेऊन यावा आणि शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर येतांना बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहनातूनच कापूस घेऊन यावा असंही आवाहन कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी केले आहे.


कापूस विक्रीसाठी आणत असताना शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नोंद असलेला अद्यावत सातबारा घेऊन यावा. तसेच जनधन बँक खाते असलेले बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणू नये, त्या ऐवज राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकचे झेरॉक्स सोबत आणावे ज्यात बँक खाते क्रमांक आणि IfSC कोड सुस्पष्ट दिसेल असे कागदपत्रे आणि आधार कार्ड शेतकऱ्यांनी सोबत आणावे असे आवाहन कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी केले आहे.  


कापूस विक्री केल्याच्या आठ दिवसांत कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.  विशेष म्हणजे पुढील कापूस खरेदी हंगामाच्या नियोजन साठी 26 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे राज्यातील सर्व संचालक यांची बैठक होणार आहे. 


राज्यात सर्वाधिक पांढरं सोन पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 4 लाख 43 हजार हेक्टर वर कापसाची लागवड झाली आहे आणि यंदाच्या कापूस खरेदीत जिल्ह्यात कळंब, यवतमाळ, पुसद, गुंज  आर्णी या पाच केंद्रावर ही कापूस खरेदी प्रक्रिया दिवाळीच्या पर्वावर सुरू केली जाणार आहे त्यामुळे या कापूस खरेदी कडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


महत्वाच्या बातम्या :