मुंबई : राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज  67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. 


राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के  झाले आहे.


मुंबईत 8 हजार 811 रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात  8 हजार 811 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 71 हजार 80 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 433 आहे.


राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी उद्योगांनी नियोजन करावे
 
ऑक्सिजनची  राज्याला खूप गरज असून  सध्या सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्ण संख्या पाहता आणखी ऑक्सिजनची  गरज भासत असून आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होतं मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने  बोलणे होऊ शकले नाही मात्र केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविडच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही मात्र आता राज्यातील उद्योगांनी सुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आत्तापासूनच करावे