मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या आवाहनानंतर काही तासातच नेत्यांनी लग्नकार्याला उपस्थित राहात नियमांना हरताळ फासला आहे.


काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री नितीन राऊत याचं भाषणात कौतुक केलं. राऊत यांनी लग्नाचा सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मात्र त्यांच्या भाषणानंतर काही तासातच त्यांच्या आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा काल पुण्यात पार पडला. मात्र या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह विविध मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचंही दिसून आलं. पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स इथं हा सोहळा पार पडला. त्यामुळं, ज्याप्रमाणे इतर लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झाल्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. तशी कारवाई धनंजय महाडिकांवर देखील होणार का असा सवाल आता विचारला जातोय.


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


या विवाह सोहळ्याला खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, रामदास आठवले यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. काल नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी एकत्र हजेरी लावली होती. काल या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे.



नितीन राऊतांचा स्तुत्य निर्णय, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह 19 फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा 21 रोजी आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता, हा सोहळा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता माझा मुलगा कुणाल आणि आकांक्षा यांच्या विवाहप्रित्यर्थ नागपुरात 21 फेब्रुवारी रोजी आयोजित स्वागत समारंभ तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. निमंत्रितांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री नितीन राऊत याचं भाषणात कौतुक केलं. राऊत यांनी लग्नाचा सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


शरद पवारांनी 1 मार्चपर्यंत सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले


कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यावर शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.


कोरोनाची खबरदारी घेत छत्रपती संभाजीराजे यांचे बुलढाणा, औरंगाबाद , नाशिक दौरे रद्द


छत्रपती संभाजीराजे यांनी देखील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं आपले दौरे रद्द केले आहेत. मागील दोन तीन दिवसांत कोरोनाचा फैलाव अचानक वाढीस लागलेला आहे. प्रत्येकाने स्वतःबरोबरच इतरांचीही काळजी घेत मास्क, सॅनिटायजर व सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासनाकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर माझा सुरू असलेला महाराष्ट्र दौरा व पुढील सर्व कार्यक्रम मी स्थगित करीत आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.