मुंबई : कोरोना संसर्गाचा विळखा 11 मे पर्यंत अधिक वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. दुसरी लाट ही 11 मे पर्यंत पीकवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, ठाणे या जिल्ह्यात अधिक धोका असल्याचं समोर आलय. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते. त्यात 11 मे पर्यंत दुसरी लाट पीकवर जाण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. राज्यातील रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिली तर 11 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.


राज्यातील फक्त 7 जिल्ह्यांमध्ये पुरेसे आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये मुंबई, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अमरावती या ठिकाणी नाही पेक्षा बरी अशी परिस्थिती पाहायला मिळते. मात्र, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात परीस्थिती गंभीर होऊ शकते. रुग्ण संख्या वाढली तर नागपूरमध्ये सर्वाधिक गंभीर परिस्थिती होऊ शकते.




11 मे पर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये 1 लाख 13 हजारच्या आसपास रुग्णसंख्या जाऊ शकते. यावेळी आयसोलेशन बेडची कमतरता 43 हजार पेक्षा जास्त भासण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये जर 40 हजार सक्रीय रुग्णांचा आकडा पार झाला तर 16 हजार 995 बेडचा तुटवडा भासेल, 3989 ऑक्सिजन बेड, 954 आयसीयू , 249 व्हेंटिलेटरचा तुटवडा होऊ शकतो.





  • यवतमाळमध्ये रुग्णसंख्या 31 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन बेड 13 हजार अतिरिक्त लागततील, ऑक्सिजन बेड 3 हजार तर आयसीयू 768 अतिरिक्त लागतील.

  • नाशिक जिल्ह्यात 95 हजार पर्यंत सक्रीय रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यासाठी 38 हजार 615 बेडचा एकूण तुटवडा असेल. यामध्ये ऑक्सिजन बेड 6 हजार 253, आयसीयू बेड 1 हजार 535 आणि 27 व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होऊ शकेल.

  • पुण्यात 1 लाख 20 हजाराच्या वरती पेशंट गेले तर 26 हजार 345 अयोसोलेशन बेड, 4 हजार 97 ऑक्सिजन बेडची कामरतरता भासू शकते.

  • ठाण्यात 79 हजारच्या वरती रुग्ण संख्या गेली तर 14 हजार 430 बेडचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

  • जर हा आकडा असाच वाढत राहिला तर राज्यातील 13 जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणावर कमी पडतील.

  • 18 जिल्ह्यात आयसीयू बेडची कमतरता जाणवेल. तर 25 जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल. 


ही दुसऱ्या लाटेतील परिस्थिती आहे. आणखी तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. त्यामुळे कोविड संसर्गाचा धोका हा मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त लसीकरण करणं हा एक आहे. मात्र, वाढत्या लसीचा तुटवडा लक्षात घेता सर्वांचं लसीकरण करणं तेवढं शक्य नाही. परंतु, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली तर कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होऊ शकतो आणि भविष्यातील हा मोठा धोका टळू शकतो.