मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात आली. आज प्रत्यक्षात लस जरी रुग्णांना देण्यात आली नसली तरी त्या संदर्भाने सगळी प्रक्रिया पडताळून पाहण्यात आली.


सोलापूर


सोलापूर जिल्ह्यात आज 4 ठिकाणी कोरोना लसीकारणासाठी ड्राय रन घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, होटगी या ग्रामीण भागातील रुग्णालयात तर महानगरपालिका क्षेत्रातील दाराशा हॉस्पीटल येथे ड्राय रन घेण्यात आली. दाराशा रुग्णालयात महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी ड्राय रनचे उद्घाटन केलं. प्रत्येक ठिकाणी 25 लोकांवर ही चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी ड्राय रन घेण्यात येत आहेत.


बीड


बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन ठिकाणी आज ड्रायरन पार पडले. त्यात बीड शहरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यानंतर वडवणी आणि परळी शहरांमध्ये सुद्धा कोरोना लसीकरणाचा ड्रायरन घेण्यात आला.. प्रत्येक ठिकाणी 25 जणांना लस देण्यासंदर्भात चे प्रात्यक्षिक यावेळी पूर्ण झाले कोविड लसीकरणासाठी आज अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली.

अकलूज


कोविड लसीकरणासाठी आज देशभर होत असलेल्या ड्रायरन साठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 आरोग्य कर्मचाऱ्यांवर चाचणी घेण्यात आली . सकाळी प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते या चाचणी कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुप्रिया खडतरे यांनी या चाचण्यांचे संपूर्ण व्यवस्थापन केले होते . चाचणीसाठी निवडलेल्या 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची पहिल्यांदा ओळख तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून नोंदणी करीत त्यांना लस देण्याचा ड्रायरन घेण्यात आला . यानंतर त्यांना लस दिल्याचे वेळेसच टोकण देत पुढच्या लसीकरणाची तारीख देण्यात आली . लस दिल्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले . हे मोहीम राबवताना संपूर्ण सोशल डिस्टन्स ,मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सातत्याने केला जात होता.


ठाणे :


ठाणे जिल्ह्यात देखील आज 3 ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची ड्राय रन ठेवली होती. याचे मुख्य केंद्र जिल्हा शासकीय रुग्णालय होते. या रुग्णालयात ड्राय रनसाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या सोबत जिल्ह्य आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग उप संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक असे सर्व अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या लसीकरणासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जवळपास 60 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.


पालघर :


कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम ( ड्राय रन ) आज पालघर जिल्ह्यात पार पडली. पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र , मासवण येथील आश्रमशाळा , तसंच वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील एक अशा तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली . प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि इतर अशा पंचवीस कर्मचाऱ्यांची निवड यासाठी करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सोळा हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे . आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृती आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली . यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ , पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.


परभणी :


परभणी जिल्ह्यात 4 ठिकाणी हे ड्राय रन सुरु आहे ज्यात परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय,मनपा आरोग्य केंद्र,जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णलाय सेलु या 4 ठिकाणी प्रत्येकी 25 जणांची नोंदणी करून हि लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जात आहे.त्या अनुषंगाने जिल्हातील आरोग्य यंत्रणा पुढील लसीकरणाबाबत सज्ज झाली आहे.

रत्नागिरी:


रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात देखील कोरोना लसीचं ड्राय रन सुरू झाले आहे. जिल्हा रूग्णालयात दररोज 100 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. एका रूग्णाला डोस घेतल्यानंतर घरी जाण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा अवधी लागणार आहे. लाभार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी, त्यांच्या नोंदणीची पडताळणी आणि निरिक्षण असे प्रमुख टप्पे यावेळी असणार आहेत. शिवाय, महिनाभराच्या अंतरानंतर पुन्हा या लाभार्थ्याला लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. सध्या जिल्हा आरोग्य प्रशासन कोरोना लसीकरणासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास इथल्या डॉक्टरांनी व्यक्त केलाय. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना देखील लसीकरणाकरता कोणताही त्रास होणार नाही याबाबत देखील योग्य ती खबरदारी घेतल्याचं अरोग्य विभागानं म्हटलं आहे.


कल्याण-डोंबिवली


कल्याण आणि डोंबिवलीमध्येही कल्याण पूर्वेतील कोलशेवाडी नागरी आरोग्य केंद्रात आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्रामध्ये 2 ठिकाणी याची ड्रायरन (रंगीत तालीम) आज पार पडले.केडीएमसीच्या कल्याण पूर्वेतील कोलशेवाडी नागरी आरोग्य केंद्रात आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्रामध्ये हे ड्रायरन घेण्यात आले. याठिकाणी 25 जणांना प्रातिनिधिक स्तरावर हा तयारीचा प्रयोग करण्यात आला. एनवेळेला शासकीय कर्मचारी गोंधळून जाऊ नये, लसीकरणादरम्यान येणाऱ्या त्रुटी आधीच लक्षात याव्यात या उद्देशाने हा ड्रायरन घेण्यात आला. या लसीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार असून दिवसाला 100 लोकांना लस देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.


संबंधित बातम्या :



Coronavirus Vaccine: येत्या काही दिवसांत देशवासियांना कोरोना लस मिळेल, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा