मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत आता नागपूर आणि सिंधुदुर्गचीही भर पडली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरातही प्रशासनानं नवे नियम लागू केले आहेत. गुरुवारपासून नागपुरातील पहिली ते आठवी या वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वर्गाच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर सिंधुदुर्गातील शाळा या पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज नागपुरातील विविध शासकीय रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासनाची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर पहिली ते आठवी वर्गापर्यंत शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


याशिवाय गुरुवारपासून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णयही नागपूर प्रशासनाने घेतला आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. मॉल्स, मंगल कार्यालय तसेच थिएटर्समध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून उल्लंघन केल्यास कठोर आर्थिक दंड लावले जाणार आहेत. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 


संबंधित बातम्या :