maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona ) रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमिवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कोरोनाचे रुग्ण वाढल्यास चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. कदाचित ही चौथी लाट असेल, परंतु, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. लोकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यायची आहे, शिवाय कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
राज्यात पुन्हा मास्क बंधणकारक करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) मार्गदर्शक तत्त्वे जारी करेपर्यंत आम्ही थांबलो आहोत. जेव्हा केंद्र सरकार नियम जारी करेल तेव्हा आम्ही देखील प्रोटोकॉल लागू करू.”
"सध्या राज्यात कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत असल्यामुळे त्याला आपण चौथी लाट म्हणता येईल. परंतु, घाबरायचं कारण नाही, फक्त सूचनांचे पालन करा, रुग्ण वाढत असले तरी चिंताजनक परिस्थिती नाही. मात्र, सर्वांनी मास्क वापला पाहिजे," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काश्मीर मधील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'काश्मिरी पंडितांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. आमच्या राज्यात त्यांचे स्वागत आहे. काश्मीरमधील परिस्थिती अजून सुधारलेली नाही. काश्मीरमधून जी माहिती समोर येत आहे ती चांगली नाही. आशा आहे की भारत सरकार यावर आपली भूमिका स्पष्ट करेल.
नवी मुंबईत झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "वृक्ष तोडणी होणार असे म्हटले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याची परवानगी दिलेली नसून तो प्रस्ताव आहे. या प्रस्तावार अभ्यास केला जात आहे. पर्यावरणासाठी आम्ही शाश्वत काम करत आहोत.
राज्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ
16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी म्हणजे 626 कोरोना रुग्ण आढळले होते. दीड महिन्यानंतर राज्यात बाधित रुग्णांची संख्या 626 वरून 4500 वर पोहोचली आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात पटीने वाढली आहे.