मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या काहीशी स्थिर असल्याचं चित्र असून राज्यात आज 2575 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 3210 जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. तर आज 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 


राज्यात आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मंगळवारी ही संख्या 13 इतकी होती. राज्यातील मृत्यू दर हा 1.84 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 78,45,300 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 16,922 इतकी असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही पुणे जिल्ह्यात असून ती 6222 इतकी आहे. त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक असून मुंबईत 3006 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.


पालघर येथे राज्यातील दुसरा झिका रुग्ण
पालघर येथील झाई गावातील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. पुण्यातील प्रयोगशाळेत या मुलीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्या अहवालानंतर या मुलीला झिकाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.


अमरावतीमध्ये कॉलराचा उद्रेक
राज्यात सध्या पाऊस सुरू असून त्या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. अमरावतीमध्ये कॉलरचा उद्रेक झाल्याचं समोर आलं असून आतापर्यंत 181 रुग्ण आढळले आहेत. 


देशातील स्थिती
गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येमुळं सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लााख 32 हजार 457 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 3.68 टक्के आणि साप्ताहिक दर 4.26 टक्के आहे.