मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. 


राज्यात आज एकूण 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,36,792 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.07 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण सांख्या 78,89, 212 इतकी झाली आहे.


सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 4559 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3324 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 555 इतके सक्रिय रुग्ण आढळतात. 


राज्यात आतापर्यंत एकूण 8,09,77,908 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.74 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. 


राज्यसरकार सतर्क
मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचं असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.