गोंदिया : गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन संपल्यानं गुरुवारी रात्री 15 गंभीर रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाल्यावर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे ऑक्सिजनच्या अभावानं हे मृत्यू झाले नसल्याचा दावा प्रशासन आणि नेत्यांनी केला आहे. रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचं गोंदियाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
गोंदियाच्या सरकारी रुग्णालयात काल 29 रुग्णांचा मृत्यू झाला जो आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मृत्यू जरी ऑक्सिजन संपल्याने झाले नसले, तरी अवघ्या दिन तासाचा स्टॉक उरल्यामुळे खूप धावाधाव झाली असल्याचं समोर आलं आहे.
विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. असे कळते की गोंदियातील या रुग्णालयात 600 सिलिंडरची गरज असताना, अर्धे सिलिंडरच्या आसपासच रोज साठा उपलब्ध असतो आणि बाकीच्या स्टॉकसाठी प्राण कंठाला आलेले असतात. रोजच्या धावाधावीत गोंदिया शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव करण्यात आली. आमदार परिणय फुके यांनी गुरुवारी रात्री सनफ्लॅग कंपनीतून सिलेंडर मिळवण्यासाठी पुढाकार घेतला, तर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल छत्तीसगडमध्ये संपर्क साधून ऑक्सिजनची व्यवस्था केली.
Oxygen Shortage | गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात 15 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप
अवघ्या दोन तासांचा ऑक्सीजन साठा शिल्लक असेपर्यंत अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही असा आरोप मात्र होतो आहे. गुरुवारी रात्री या ऑक्सिजनवर अवलंबून असणारे 300 रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.
काय म्हणाले पालकमंत्री नवाब मलिक
गोंदियाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं की, अपुऱ्या ऑक्सिजनमुळे प्राण गमावल्याची ही बातमी चुकीची आहे, मी प्रत्यक्ष काल गोंदियामध्ये होतो, मीडिया आणि रुग्णालयाचे डीन उपस्थित होते. परिस्थितीचा आढावा मी घेतला आहे, रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा आहे, लोकांनी चिंता करायची गरज नाही.
Gondia Corona | गोंदियात 15 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू ; पालकमंत्री नवाब मलिक म्हणतात...
मध्यरात्री आमदार विनोद अग्रवाल यांची मदत
काल मध्यरात्री रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपला असल्याची माहिती स्थानिक आमदार विनोद अग्रवाल याना मिळताच अग्रवाल यांनी रुग्णालय गाठत गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातून माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या मदतीने 40 ऑक्ससीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. तर छत्तीसगढ राज्यातील माजी मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने छत्तीसगढ राज्यातून 90 सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला.
भाजपचा सरकारवर आरोप
भाजप खासदार मनोज कोटक यांनी या प्रकरणानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईमध्ये कालपासून अनेक रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपला आहे.मुंबई उपनगरातील पालिका आणि खाजगी कोरोना रुग्णालयात स्थिती चिंताजनक आहे. ऑक्सिजन पुरवठा ही जबाबदारी ज्यांची होती ते कोणी ही उत्तर देत नाहीयेत. जेव्हा रुग्ण संख्या वाढत होती तेव्हाच ऑक्सिजनची सोय करणे गरजेचे होते. भंडारा , गोंदिया सारखी मुंबईत स्थिती होऊ नये अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी दिली आहे.