सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रत्येक गावागावात पोहोचला असून कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच वैभववाडी तालुक्यातील दिगशी गावात एकाच वेळी 67 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अजून 50 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहेत. वैभववाडी तालुक्यातील दिगशी गाव महसुली गाव असून गावची लोकसंख्या 383 आहे. या गावात मुंबईहून एक कुटुंब शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी आलं होतं. मात्र गावी आल्यावर कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी केली नाही. त्यातच त्या कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाचे नियम न पाळता गावात फिरले. गावातील अनेक व्यक्ती त्यांचा संपर्कात आले. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र दिगशी गावातील एक वृद्ध व्यक्ती मुंबईत गेल्यावर कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी आपआपली कोरोना चाचणी केली. त्यात अनेकजण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे सध्या वैभववाडीत दिगशी गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे.


वैभववाडीतील दिगशी गावात आतापर्यंत 183 लोकांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली आहे. त्यात 67 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर अजूनही त्यापैकी 50 व्यक्तीचा अहवाल प्रतीक्षेत आहेत. ज्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यातील काही व्यक्तींना घरीच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले तर काहींवर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. 


त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील दिगशी गाव सध्या तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. मुंबई, पुणे किंवा इतर भागातून येणाऱ्या व्यक्तींची जिल्ह्याच्या सीमेवर कोविड संदर्भात चाचणी केली असती तर ज्यांना लक्षणं आहेत किंवा पॉझिटिव्ह आहेत अशांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले गेल्यास जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसून आला असता. शिमगोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 


वाशिमच्या गोवर्धन गावातही सात दिवसात 537 नागरिकांना कोरोनाची लागण


वाशिमच्या गोवर्धना गावात काल एकाच दिवशी कोरोनाचे 207 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आठ हजार लोकसंख्येच्या गावात गेल्या सात दिवसात 537 रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी 220 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासन खडबडून जागं झालं असून गावात आरोग्य पथक दाखल झाल आहे. संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातील अनेक नागरिकांनी शेतात मुक्काम ठोकला आहे.