Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये घट होत आहे. आज राज्यात 1189 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज 1529 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 78,39,208 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.93 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 18027 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे सक्रिय रूग्णांची संख्या देखील कमी होत आहे.
रविवारच्या तुलनेत आज कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. रविवारी राज्यात दोन हजार 591 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर दोन हजार 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात काल एकाही रुग्णाचा मृत्यू नव्हता. परंतु, आज दोन रग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास दर दिवशी चार हजारच्या आसपास कोरोना रूग्णांची नोंद गेल्या आठवड्यात होत होती. परंतु, अलीकडील काही दिवसात या संख्येत घट होत आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत रविवारच्या तुलनेत आज किंचित घट दिसून आली आहे. रविवारपेक्षा 164 कमी रुग्ण आज आढळले आहेत. आज 235 नवे कोरोनाबाधित समोर आले असून रविवारी ही संख्या 399 इतकी होती. रुग्णसंख्या मागील काही दिवसांत काही प्रमाणात कमी होत असली तरी अजूनही कोरोनाबाधित आढळत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी कायम असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
देशातील कोरोना रूग्णांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. परंतु, वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचं कारण बनली आहे. देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 30 हजारांच्या पार गेली आहे. तर कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यानेही पाच लाख 25 हजारांचा आकडा पार केला आहे.