मुंबई: कोरोना काळात केंद्राकडून मदत मिळाली. मात्र आता राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं. मी याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना विनंती केली आहे की मदत बंद करु नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्रा'चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चर्चेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. यावेळी टोपे यांनी दरेकरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.


संपूर्णपणे पारदर्शकता 


यावेळी राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा आकडा एवढा मोठा होईल हे कुणालाही कल्पना नव्हती. आयसीएमआरच्या नियमांनुसार आपण टेस्टिंग, ट्रेसिंग अशा गोष्टी करत आहोत. यामध्ये संपूर्णपणे पारदर्शकता आहे. जनतेला विश्वासात घेऊन काम केली जात आहे. संक्रमण वाढत आहे, स्थिती गंभीर आहे. मात्र त्यात जेवढ्या उत्तम पद्धतीनं जीव ओतून काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असं टोपे म्हणाले.


 कुठेही व्हेंटिलेटर्सची कमतरता नाही


व्हेंटिलेटर्स, बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारला असता आरोग्यमंत्री म्हणाले की, व्हेंटिलेटर्सची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. कुठेही व्हेंटिलेटर्सची कमतरता नाही, राज्यात ऑक्सिजन 900 मेट्रिक टन उत्पादन होतंय, त्यात आपल्याला 400 मेट्रिक टन लागत आहे. ऑक्सिजनसाठी वेगळी व्यवस्था तयार केली आहे. आम्ही उद्योग जगतासाठी लागणारा ऑक्सिजन केवळ 20 टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे तर आरोग्यासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑक्सिजन वहन करण्याच्या गाड्या सुद्धा व्यवस्था केली आहे, असं टोपे यांनी म्हटलं आहे.


500 नव्या अॅम्ब्युलंस घेण्यासाठी मंजुरी


अॅम्ब्युलंसच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने 500 नव्या अॅम्ब्युलंस घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्या लवकरात लवकर रस्त्यावर दिसतील. जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की खाजगी अॅम्ब्युलंस घ्या, आमदारांनी आपल्या निधीतून अॅम्ब्युलंस दिल्यात. कुठंतरी मॅनेजमेंटचा अभाव असल्यानं काहींना मिळू शकली नाही हे खरं आहे, असं देखील आरोग्यमंत्री म्हणाले.


टोपे म्हणाले की, आम्ही आमच्याकडे कुठलेही अधिकार ठेवले नाही. सगळे अधिकार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले. जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्याविषयक सुधारणांसाठी खर्चाचे अधिकार दिले. आज राज्य सरकार सगळे खर्च सोडून आपण कोरोनावर सगळा खर्च करतोय. आपल्या अनेक चांगल्या गोष्टींचे फॉर्म्युले अन्य राज्यांनी कॉपी केले आहेत, असंही टोपे यांनी सांगितलं.