सांगली : वाढता कोरोना संसर्ग पाहता सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी कमी करा अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. तसेच सोमवारपासून गर्दीवर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित कोरोना आढावा बैठकी नंतर ते बोलत होते.


सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना आता समूह संसर्गमध्ये पसरला आहे. त्यामुळे झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 11 सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू पुकरण्यात आला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शवला, तर नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने पुकारलेला जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात आणि विशेषतः महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दरही वाढत आहे.


या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये व्यापारी, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. तर जनता कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी जनता कर्फ्यू मध्ये होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर कारवाई करण्याच्या बाबतीतला निर्णय घेतला आहे.


पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार!


सोमवारपासून सांगली महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर, त्याचबरोबर भरण्यात येणाऱ्या बाजारांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने सांगली पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होताना दिसली नाही, तर पुढचा टप्पा नाईलाजाने लॉकडाऊन करण्याचा राहील, असा इशारा देत जनतेने बाजारात व इतर ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी सांगलीच्या जनतेला केले आहे.


सांगली महानगरपालिका क्षेत्रात आठवडे बाजार व रस्त्यावर बसून विक्री बंद


महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी सोमवारपासून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आठवडे बाजार व रस्त्यावर बसून फळे, भाजीपाला व अन्य सर्व प्रकारची विक्री बंद करण्यात येत आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेत. आठवडे बाजार भरलेला वा रस्त्यावर बसून विक्री होत असलेली आढळल्यास विक्रेत्याच्या सर्व वस्तू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. भाजीपाला, फळे व अन्य वस्तू फक्त वाहनाद्वारे फिरून विक्री करता येतील. असे वाहन एका जागेवर उभे राहून विक्री करत असल्याचे आढळल्यास वाहनही जप्त करण्यात येईल.


Sangli Janata Curfew | सांगलीत आजपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध