मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 71 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात आज 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 396 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (09), नंदूरबार (6), धुळे (3), जालना (52), परभणी (59), हिंगोली (17), नांदेड (12), अकोला (27), वाशिम (08), बुलढाणा (06), यवतमाळ (08), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (4), चंद्रपूर (95), गडचिरोली (18 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 36 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,45,427 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,423 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 87, 39, 974 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,50, 856 (11.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,632 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4761 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1151 दिवसांवर गेला आहे.
सलग दोन दिवस 20 हजारांच्या आत आलेल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात एकूण 23 हजार 529 रुग्णांची नोंद झाली आहे तर 311 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्या आधी मंगळवारी देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद झाली होती तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी 12 हजार 161 रुग्णांची भर पडली तर 155 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल 17 हजार 862 रुग्ण कोरोनामुक्त झाले.