मुंबई :  सिटी सहकारी बँक (City Co-Operative Bank Scam) घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर सुरू झालेला ईडीचा (ED) ससेमीरा चुकवण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul)  यांना आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र अडसुळांना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास गुरूवारी हायकोर्टानं नकार दिला आहे. तर अडसूळ हे केवळ नाटक करत असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. अश्याप्रकारे लोकप्रतिनिधी राहिलेले अडसूळ जर तपासकामात अडथळा आणत असतील तर तपास कसा करणार?, असा सवालही यावेळी एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित करत अडसुळांच्या याचिकेला जोरदरा विरोध केला. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी यावर तातडीची सुनावणी घेण्यात आली. त्यावर शुक्रवारी रुग्णालयात दाखल असलेल्या अडसूळ यांचा वैद्यकिय अहवाल सादर करण्याचे निर्देश देताना याचिकेवर शुक्रवारी पुन्हा सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी  27 सप्टेंबरला सकाळी अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून चौकशी सुरू करतात अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. आणि त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी त्यांना तिथून डिस्चार्ज देत जवळच्याच एसआसव्ही रूग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान याप्रकरणीत दाखल ईसीआयआर रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं अशी मागणी करत अडसुळांनी हायकोर्टात धाव घेतली.


आनंदराव अडसूळ यांच्यावतीने अ‍ॅड. अभिनव चंद्रचुड यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, सिटी बँकेच्या 900 कोटी रूपयाच्या आर्थिक गैरव्यवहाराशी अडसूळ यांचा थेट कसलाही संबंध नाही. केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याच्याविरोधात अडसूळ यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार  केल्यानंच राजकीय सुडबुध्दीनं ही खोटी तक्रार करण्यात आली आहे. तसेच अडसूळ यांची प्रकृती वयोमानानुसार ढासळल्यानं त्यांना रूगणलयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रूग्णालबाहेर ईडीचे अधिकारी सशस्त्र पाहारा देत अडसूळ बाहेर पडायचीच वाट पाहत आहेत. त्यामुळे याच धर्तीवर त्यांना ईडीच्या कारवाई पासून तूर्तास दिलासा द्यावा अशी विनंती कोर्टाकडे केली गेली. तर ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी या याचिकेलाच जोरदार विरोधात केला. बँकेच्या गैरव्यवहारासंबंधी तक्रार आल्यानंतर ईडीनं आपली चौकशी सुरू केली, या चौकशीचा निवडणूक प्रकरणी अडसूळ यांनी केल्या तक्रारीशी काही संबध नाही. ईडीनं यापूर्वीही त्यांना चौकशीला हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. त्यामुळे केवळ कारवाई टाळण्यासाठीच त्यांनी हा प्रकृती अस्वस्थ्याचा बनाव रचत रूग्णालय गाठलं आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर तपासयंत्रणेने चौकशी कशी करायची?, असा सवालही एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित केला. याची दखल घेत हायकोर्टानं अडसुळ यांचा वैद्यकिय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी उद्या पुन्हा ठेवली आहे. मात्र या याचिकेवर सुनावणी घेतल्याशिवाय अडसूळ यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे.