मुंबई : राज्यात आज 3,643 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 38 हजार 794 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.
राज्यात आज 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 43 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (44), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (14), हिंगोली (61), नांदेड (35), अमरावती (89), अकोला (15), वाशिम (9), बुलढाणा (29), यवतमाळ (13), वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (27) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार, परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 24,45,689 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,28, 294 (12.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,02,888 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
6 दिवसांनी देशात 30 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सहा दिवसांनी 30 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी 25,166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. केरळमध्ये रविवारी कोरोना व्हायरसच्या 10,402 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, देशातील एकूण दैनंदिन आकड्यापैकी 40 टक्के रुग्ण केवळ केरळातील आहेत. काल दिवसभरात 66 रुग्णांचा केरळात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर केरळात आतापर्यंत 38 लाख 14 हजार 305 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात शनिवारी विक्रमी लसीकरण
कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने काल (21 ऑगस्ट) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एकाच दिवशी सुमारे 11 लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.