Congress protest Against Ed And CBI : केंद्र सरकार तपास यंत्राणाचा गैरवापर करत विरोधकांना अडकवत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येतो. त्याविरोधात आता काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे.  केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग या मुद्द्यावर 13 मार्च रोजी मुंबईत राज्यपाल भवनासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 


शुक्रवारी उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणावर प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाया संदर्भातील कागदे किरीट सोमय्याकडे कसं काय पोहोचतात? ईडीची कारवाई कुठे होणार हे कोणालाच माहीत नसताना किरीट सोमय्याला कसं माहीत होते? असे प्रश्न विचारले होते.  भाजपचा बेस संपला आहे म्हणून ते विरोधकांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले. 


अनिल देशमुख यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. शंभर कोटींचा आरोप केला. मात्र काहीच मिळाले नाही. परमवीर सिंहाची चौकशीच केली नाही आणि निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात ठेवले. जे जे भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात ते तिथे स्वच्छ होतात.. भाजपमध्ये सर्व दूधाने धुतलेले आहेत का? भाजपमध्ये असे अनेक नेते हे ज्यांच्याकडे स्कूटर नव्हती.. त्यांच्याकडे आज हेलिकॉप्टर आहेत.. भाजप नेत्यांनी मोठे बंगले बांधले आहेत... यांच्याकडचे पैसे कुठून आले.. याची चौकशी करणार नाही का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. 


घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे.. मात्र घोटाळेबाज तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ कसे काय होतात ? याचे उत्तर कोण देईल... घोटाळेबाजांची संख्या भाजप वाढवत आहे आणि दुसऱ्यांवर बोट दाखवत आहे. 13 तारखेला देशभर राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले जाणार आहे.. 13 तारखेला मुंबईतही काँग्रेस हे आंदोलन करणार आहे.. यामध्ये प्रमुख मुद्दा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा राहणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. 


केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत - सुप्रिया सुळे


''सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे, असे आज सुप्रिया सुळे म्हणाल्या.  त्या पुढे म्हणाल्या की, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे.