Maharashtra Congress : 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' अशा पद्धतीचं प्रशिक्षण देवून काँग्रेसनं (Congress) गावस्तर ते तालुकास्तराच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्याची रणनीती आखली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसनं राज्यातील 288 जागा लढविण्याच्या दृष्टीनं चाचपणी सुरू केलेली आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवस भंडारा जिल्ह्यात ठाण मांडून होते. यादरम्यान, त्यांचा गृह मतदार संघ असलेल्या साकोलीतून त्यांनी राज्यातील 288 मतदारसंघाची निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनं राबविण्यात येणाऱ्या तयारीचं प्रशिक्षणाची सुरुवात भंडाऱ्यातून केली आहे. 


गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातून आलेले जगदीश राठोड, वानी आणि जय पटेल या तिघांनी बूथ प्रमुखांना प्रशिक्षण दिलं. एक प्रकारे महाराष्ट्रात ज्या 288  जागांवर लढण्याची काँग्रेसनं तयारी चालविलेली आहे. त्या दृष्टीनं नाना पटोले यांनी त्यांच्या मतदार संघातून श्रीगणेशा केला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावनिहाय बूथ प्रमुखांना एक फाईल देत त्यात बूथ प्रमुख, सर्कल प्रमुख आणि तालुकाप्रमुख याचं कर्तव्य आणि मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना सांगायचे काँग्रेसचे ध्येयधोरण याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेतून या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. जर, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं स्वतंत्र निवडणूक लढविल्या तर याचा काँग्रेसला फायदा होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना असून हा साकोली पॅटर्न आता राज्यभरातील 288 विधानसभा क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.


राज्यभरातील 288 विधानसभा क्षेत्रात साकोली पॅटर्न


पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे, त्या अनुषंगाने राज्यात  288 जागेवर आम्ही उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या  (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा मेरीटच्या आधारावर  काँग्रेसला (Congress) सुटतील त्या त्या जागेवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि  त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.


असे असले तरी आम्ही सर्व एकसाथ एका विचाराने पुढे जात आहोत. आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच नावाने आम्ही लढणार आहोत.  या चाचपणी संदर्भातील अर्थाचा अनर्थ कुणीही करू नये. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीवर स्पष्टोक्ती दिली आहे. नुकतीच नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यामुळे आता काँग्रेसनं गावस्तर ते तालुकास्तराच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्याची रणनीती आखली असल्याचे दिसून येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या