Maharashtra Congress : एकीकडे शिवसेनेतल्या अंतर्गत कलहानं शिवसेना कुणाची? हे टोक गाठलंय तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही सध्या सगळंच काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटींग केल्याप्रकरणी दिल्लीतून चौकशी करण्याकरता निरीक्षक म्हणून नेमलेल्या मोहन प्रकाश यांचा अहवालातील खळबळजनक माहिती माझाच्या हाती लागली आहे. या अहवालानंतर आता त्या सात आमदारांवर कारवाई होणार का?? हे पहाणं महत्वाचंय...
शिवसेनेतून शिंदे गट फुटला त्याच विधानपरिषद निवडणूकीच्या दिवशी काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहाची नांदी सुरु झाली होती. विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्ररांत हंडोरेंना पाडण्याचा विडा काँग्रेसच्याच काही नेत्यांनी उचलला अशी खळबळजनक माहिती आता पुढे आली आहे. हे घरचे भेदी कोण हे शोधण्याकरता काँग्रेस हायकमांडनं निरीक्षक म्हणून पाठवलेल्या मोहन प्रकाश यांच्या अहवालातून आता त्या सात आमदारांची नावं समोर येतायेत...
उत्तर महाराष्ट्रातील एक आमदार, मराठवाड्यातील दोन ते तीन आमदार आणि मुंबईतील दोन आमदारांच्या क्रॉस वोटींगचा अहवाल हायकमांडकडे दाखल झालाय...एकीकडे विधानपरिषद निवडणूकीतील सात आमदारांचं क्रॉस वोटींग प्रकरण ताजं असतांनाच शिंदे-फडणविस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या तब्बल 11 आमदारांची अनुपस्थिती होती. या वेळी उशीरा आल्यानं मतदान न केलेल्या अदृश्य हातांचे नव्या सरकारकडून आभारही मानले गेले.
एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांनी आपल्याच आमदारांकडून मिळालेल्या धक्क्यांमुळे काँग्रेसची महाराष्ट्रात लाजिरवाणी अवस्था झाली. त्यामुळे, काँग्रेसमधून घरच्या भेदींवर लवकरच कारवाई व्हावी ही मागणीही आत जोर धरु लागलीय. विधानपरिषदेचे काँग्रेसचे पडलेले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंनी तर पराभवानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसमधली अंतर्गग खळबळ कशी समोर आली??
चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसकडून विधानपरिषदेचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार असूनही सर्वच पहिल्या पसंतीची मते त्यांना मिळाली नाहीत. हंडोरेंना पहिल्या फेरीत 22 तर दुस-या क्रमांकाचे काँग्रेस उमेदवार भाई जगतापांना 20 मते मिळाली. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपैकी एकही उमेदवार पहिल्या पसंतीच्या 26 मतांचा कोटा पूर्ण करु शकला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये भाई जगताप विजयी झाले. मात्र चंद्रकातं हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला.
विधानपरिषद निवडणूकीच्याच दिवशी जर शिवसेनेत मोठे बंड झाले नसते तर त्याच वेळी काँग्रेसमध्येही नाराजांचा गट फुटण्याच्या तयारीत होता अशी चर्चा राजकिय वर्तृळात दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेपाठोपाठ महाविकास आघाडीतल्या काँग्रेसमधूनही कोणी बंडाचं निशाण फडकवलं तर आश्चर्य वाटायला नको.