Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट आहे. हवामानात अचानक बदल झाल्याचं दिसत आहे. राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. तर काही भागात पाऊस (Rain Prediction) पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात राज्यात काही भागात पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. हवामानात बदल झाल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


कोकणात हुडहुडी, किमान तापमानात मोठी घट 


देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. मुंबईतील किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. मुंबई यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत किमान तापमान 17.1 अंश सेल्सिअस तर डहाणूत तापमान 15.3 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. माथेरानमध्ये तापमान 15.8 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. यासोबतच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे.


गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी


गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलक्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत होतं. त्यातच मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गहु, हरभरा, पोपट या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू असुन भात पिकाला फायदा होणार आहे. धुळयात तापमानाचा पारा 7 अंशावर पोहोचला आहे. तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. वाढत्या थंडीचा रब्बी हंगामाच्या पिकांना फायदा होणार आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा अजून घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


विदर्भात पावसाची शक्यता


राज्यात काही भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.