मुंबई : राज्यसभेनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या हितेंद्र ठाकूर यांच्या घरी येरझाऱ्या वाढल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्यानंतर आता भाजपच्या प्रसाद लाड यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि आपल्याला मदत करावी असं साकडं घातलं. 


या आधी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकुर यांच्या घरी सर्व पक्षीय नेत्यांनी येरझाऱ्या मारल्या, आता विधान परिषदेसाठी त्यांच्याकडे असलेली तीन मतं मिळवण्यासाठी प्रत्येक जण ठाकूरना साकडं घालतोय. या आधी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकुर यांच्या घरी भेट दिली. पण आपण आपल्या बहिणीच्या घरी गेलो, गप्पा मारल्या आणि निघालो असं भाई जगताप म्हणाले. 


भाई जगताप यांच्यानंतर भाजपच्या मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील आणि रामराजे निंबाळकर यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि आपल्यालाच मत द्यावं अशी मागणी केली. 


आज भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेली तीन मतं प्रत्येकालाच हवी हे उघड आहे. पण ठाकूर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. 


बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत. ते जितके पवारांच्या जवळचे आहेत तितकेच उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजपच्याही जवळचे आहेत. त्यामुळे त्यांचं मत कुणाकडे जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


या निवडणुकीत भाजपला आपला शेवटचा उमेदवार निवडून आणण्यासाठी 22 आमदारांची गरज लागणार आहे. त्यामुळे हा मोठा आकडा गाठण्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा यशस्वी होतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.